नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या मुद्द्यावर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभेतून अपात्र ठरल्याबद्दल ते म्हणाले की, सध्या सरकार घाबरून जी कारवाई करत आहे त्याचा फायदा विरोधकांना होईल. यासोबतच अदानीचा मुद्दा दडपण्यासाठी सरकार विरोधी नेत्यांवर कारवाई करते, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, भारतीय लोकशाहीवर वेळोवेळी हल्ले होत आहेत. ते म्हणाले की, मी कोणाला घाबरत नाही. मी भारतातील लोकांचे आणि लोकशाहीचे रक्षण करत राहीन. आपल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी या भाजपच्या मागणीवर राहुल यांनी स्पष्टपणे सांगितले की, गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत. मी माफी मागणार नाही. मी सावरकर नाही.
अदानींच्या मुद्द्यावरुन लक्ष हटविण्याचा प्रयत्न
अदानीबाबत मी सरकारला प्रश्न करेन, मला अपात्र ठरवून किंवा तुरुंगात टाकूनही सरकार मला धमकावू शकत नाहीत. अदानीच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा सारा खेळ खेळला जात आहे. सरकारसाठी देश फक्त अदानी आहे आणि अदानी फक्त देश आहे. अदानी सर्वात भ्रष्ट, मोदीजी त्याला का वाचवत आहेत? मी विचारतो, अदानीच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी कोणाचे? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.
विरोधकांसोबत एकत्र काम करू – राहुल
निवडणुकीत विरोधकांच्या पाठिंब्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानतो. आगामी काळात सर्व मिळून काम करू. त्यांनी मला कायमचे अपात्र ठरवावे, पण मी माझे काम करत राहीन, असे राहुल म्हणाले.
वायनाडच्या लोकांना पत्र लिहिणार – राहुल
आता वायनाडमधून कोण निवडणूक लढवणार? या प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, ते काँग्रेस अध्यक्ष ठरवतील. वायनाडच्या लोकांनाही पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपावर राहुल गांधी म्हणाले की, मी नेहमीच बंधुभावाबद्दल बोललो.