पुणे : पुणे शहरात सध्या एक अनोखी चळवळ पाहायला मिळत आहे. या आंदोलनांतर्गत दोन दिवस उपोषण करणार आहेत. सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनतर्फे ही चळवळ चालवली जात आहे. यामध्ये ‘जबरदस्तीने लग्न करणे म्हणजे वैवाहिक बलात्कार’ या मोहिमेअंतर्गत लोकांना एकत्र करून देशात आवाज उठवला जात आहे. “पुरुषांचा आदर करा, पुरुष देखील मानव आहेत” यासोबतच ‘मर्द को भी दर्द होता है’, ‘नारीवाद कॅन्सर है’ अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तरुणांनी एकत्र येत ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांच्या फोटोची पूजा करत आरतीही सादर केली. सेव इंडियन फॅमिली फाउंडेशन तर्फे हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात केले. आमच्या सारख्या तरुणांवर महिलांकडून खोटे आरोप करून आमच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. आम्हाला न्याय मिळत नाही. मात्र ट्विटर हे असे एकमेव स्थळ आहे जिथे आम्हाला मुक्तपणे व्यक्त होयला मिळतं म्हणून आम्ही इलॉन मस्क यांची पूजा करून त्यांचे आभार मानतो आहे, असं एका तरुणाने यावेळी सांगितलं.
पुरुषांनाही संरक्षण देण्याची मागणी
सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन (SIFF) चे पुरुष कार्यकर्ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्रीवादी स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन करत आहेत. SIFF च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ खोट्या वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांबद्दल जनजागृती आणि निषेध दर्शवण्यासाठी आज आंदोलन केले. सर्व कायदे हे स्त्री आणि पुरुष हा भेदभाव न करता समान केले पाहिजेत. कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पुरुषांना न्यायालयाने संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.