नवी दिल्ली : देशात महागाई सातत्याने वाढत आहे. सामान्य माणूस महागाईच्या भाराने हैराण झाला आहे. आता एप्रिलपासून महागाईत आणखी एक वाढ होणार आहे. वास्तविक, एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. यात पेनकिलर आणि अँटीबायोटिक्ससह सर्व औषधींचा समावेश आहे.
आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. या अत्यावश्यक औषधांबद्दल बोलायचे झाले तर त्यात पेनकिलर, अँटीबायोटिक्स, हृदयाची औषधे इ. या सर्व औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. खरं तर, वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना दरवाढ करण्याची परवानगी देण्यासाठी सरकार तयार आहे.
फार्मा उद्योगाकडून दरवाढीची मागणी
औषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने सांगितले की, 2022 पर्यंत सरकारने अधिसूचित केलेल्या WPI मधील वार्षिक बदलाच्या आधारे किंमती वाढवल्या जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा उद्योग औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करत होता.
किंमतीत 12 टक्क्यांची वाढ
एका अहवालानुसार औषधांच्या किमती 12 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. औषधांच्या किमती वाढण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. शेड्यूल औषधांच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी वाढू शकतात. शेड्यूल औषधे ही अशी औषधे आहेत ज्यांच्या किंमती नियंत्रित आहेत. नियमानुसार शासनाच्या परवानगीशिवाय शेड्यूल औषधांच्या किमती वाढवता येत नाहीत. WPI मधील वार्षिक बदलामुळे किमतींमध्ये वाढ माफक प्रमाणात झाली आहे, जी काही वर्षांमध्ये 1% आणि 2% दरम्यान आहे. सूत्रांनी सांगितले की, NPPA पुढील काही दिवसांत निर्धारित फॉर्म्युलेशनच्या कमाल किमती सूचित करेल.
उद्योगधंद्यांना दिलासा मिळेल
औषधांच्या किमती वाढल्याने या उद्योगाशी संबंधित लोकांना आवश्यक तो दिलासा मिळणार आहे. काही काळापासून, औषधी वस्तू, मालवाहतूक आणि प्लास्टिक आणि पॅकेजिंग वस्तूंसह कच्च्या मालामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे खर्चावर परिणाम झाला आहे. औषधांच्या किमती वाढल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.