पुणे : देशात झपाट्याने पसरत असलेल्या इन्फ्लुएन्झा व्हायरसचा पुण्यातही प्रसार होऊ लागला आहे. पुण्यात H3N2 विषाणूच्या बाधेमुळे दोन जणांना प्राण गमवावे लागले आहे. H3N2 मुळे पुण्यात प्रथमच दोन मृत्यू झाले आहेत. गेल्या 13 दिवसांत हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून, सोबत दोघांनाही सहव्याधी होत्या.
शहरातील कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयात 67 वर्षीय H3N2 बाधित ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू होते. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्याचा 11 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बीडच्या H3N2 चा संसर्ग झालेल्या 37 वर्षीय महिलेवर हडपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तर सोबतच ऑटोइम्युन डिसिज, यकृताचा आजार व मेंदूत रक्तस्राव झालेला होता. तिचा 23 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नेमका कशामुळे झाला मृत्यू?
या दोन्ही रुग्णांच्या मृत्यूचे सखोल परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची मृत्यू पडताळणी समितीची बैठक झाली. या बैठकीत तज्ज्ञ डॉक्टरांनी या दोन्ही रुग्णांचे उपचार, त्यांच्या मृत्यूचे कारण याचे बारकाईने परीक्षण केले असता दोघांचाही मृत्यू H3N2 ने झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. म्हणजेच सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले. यात या दोन्ही रुग्णांना एन्फ्लूएंझा H3N2 ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील एक पुण्यातील, तर दुसरी बीडमधील महिला आहे. ती उपचारासाठी पुण्यात आली होती. शिवाय हे दोन्ही रुग्णांना सहव्याधी होत्या. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. या विषाणूची बाधा झाल्यावर त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्यप्रमुख तथा साथरोग विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.