छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे उकळविण्याचा प्रकार समोर आहे. यामध्ये अनेकांना यामध्ये ऑनलाईन भामट्याने कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाइन भामट्याने चक्क एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळविण्याचा आल्याचा प्रकार समोर आला आहे.
यामध्ये बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने हे पैसे उकळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मोक्षदा पाटील यांच्या नावे बनावट ट्विटरवर खाते
एका ऑनलाइन भामट्याने महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर खाते तयार केले होते. त्यामध्ये त्याने अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना मेसेज केले असल्याचे समोर आले आहे. त्यात त्याने गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठीचे मेसेज केल्याचे निष्पन्न झाले आहे.
फोन पे च्या माध्यमातून पैसे मागविले
त्यामध्ये मोक्षदा पाटील यांचे अकाऊंट असल्याचे भासवत त्याने विश्वास संपादन करून फोन पे च्या माध्यमातून पैसे मागविले आहे. यामध्ये ऑनलाइन भामट्याने मदतीच्या नावाखाली केलेली लूट पाहून पोलिस दलात खळबळ उडाली आहे. थेट पोलिसांच्याच नावाने लूट करण्याचे धाडस कुणी केले याबाबत पोलिस शोध घेत आहे.
पोलिस संशयित व्यक्तीच्या मागावर
मोक्षदा पाटील यांच्या ओळखीतील काही अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी खात्रीसाठी विचारणा केली होती. त्यावरून हा प्रकार समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सायबर पोलिस संशयित व्यक्तीच्या मागावर आहे.
बनावट ट्विटर अकाऊंट बंद
दरम्यान मोक्षदा पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ट्विटर कडे याबाबत रिपोर्ट केल्यानंतर ही अकाऊंट बंद झाले असले तरी अनेकांची फसवणूक यामध्ये झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे असेल.