धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली. एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसासह तीन जण जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात लावले. असतानाच, गावात दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनाचीदेखील तोडफोड केली. या घटनेची माहिती जळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर जळगाव, धरणगाव व चोपडा येथून पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता. दंगलप्रकरणी 58 जणांना अटक झाली असून, त्यापैकी 16 जणांना पोलीस कोठडी उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांकडून शांततेचे आवाहन
घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, ऋषिकेश रावले, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह पोहचले आहेत. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक बोलाविले आहेत. संशयितांची धरपकड रात्रीच करण्यात आली असून गावात शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.