इंदूर : आज रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशात इंदूरच्या बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने सुमारे 25 भाविक विहिरीत पडले. विहिरीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि बचाव दलाच्या पथकाने धाव घेतली असून, विहिरीत पडलेल्या भाविकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली. विहिरीच्या छतावर 25 हून अधिक लोक बसले होते. वजन जास्त झाल्याने छत तुटले आणि लोक खाली पडले. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हे मंदिर सुमारे 60 वर्षे जुने आहे. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात खूप गर्दी होती.
पंतप्रधानांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून इंदूरमधील घटनेने खूप दुखावले असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी फोनवरुन संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. राज्य सरकार बचाव आणि मदत कार्यात वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत 10 जणांना विहिरीच्या पायऱ्यांवरून वाचवण्यात यश आले आहे. तर 9 जणांना सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित लोकांच्या सुटकेसाठी वेगाने प्रयत्न सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापणाने सांगितले आहे.