जळगाव : पारोळा तालुक्यातील पिंप्री येथील सरपंच ज्योत्स्ना सुनील पगारे आणि तामसवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य शैलेश दिलीप महाजन यांना जागेत अतिरिक्त अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा निकाल त्यांनी नुकताच दिला आहे.
पिंप्री येथील सरपंच ज्योत्स्ना पगारे यांचे दीर सुभाष पगारे, शैलेश पगारे, सिद्धार्थ पगारे यांचे नावे शासकीय गावठाण जागेत वेगवेगळे अतिक्रमण करून रहिवास व वापर करीत असल्याने सरपंच ज्योत्स्ना पगारे या अपात्र झाल्या आहेत. याबाबत प्रमोद राजलाल पाटील, रामकृष्ण गंभीर पाटील, गोपाल भाईदास पाटील यांनी तक्रार दिली होती.
तामसवाडी येथील सदस्य अपात्र
तामसवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य शैलेश दिलीप महाजन यांनी त्यांच्या शेतात गावठाण सार्वजनिक जागेत अतिक्रमण करीत विहीर व बोअरवेल खणलेली होती. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे. याबाबत दिलीप जगन्नाथ पाटील यांनी तक्रार दिली होती. दोन्ही कारवाईमुळे पारोळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.