मुंबई : वाढत्या महागाईत अर्पण निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक मोठा झटका बसला आहे. वीज वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय आजपासून लागू केला असून, त्यामुळे घरगुती दरात 6 टक्क्यांची वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरने ही दरवाढ केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के, तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के, तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ असेल. बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के झाली आहे. 2024-25 साठी 6.35 टक्क्यांची दरवाढ असेल. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के दरवाढ झाली आहे. त्यात 2023-24 साठी 2.1 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाल्याचे समजते.
महावितरणने काढले प्रसिद्धीपत्रक
महावितरण अर्थातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि 21 फेब्रुवारी, 2023 ते 03 मार्च, 2023 दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या. जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने 31 मार्च, 2023 रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष 2023 – 24 आणि 2024-25 साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक 1 एप्रिल 2023 पासून अंमलात येतील.