छत्रपती संभाजीनगर : गटविकास अधिकारी हे विहिरी मंजूर करण्यासाठी गरीब शेतकर्यांकडून पैसे मागतात. पैशांशिवाय इथे काम होत नाही. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील सरपंचाने गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटाचा हार घालून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उधळल्या. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे.
पंचायत समिती कार्यालय येथे विहीर मंजूर करण्यासाठी तसेच गोठा मंजूर करण्यासाठी या व अशा इतर कामासाठी गटविकास अधिकारी शेतकर्यांना पैशांची मागणी करीत आहे. त्याशिवाय कामे होत नाही, म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकर्यांकडून पैसे जमा केले व पंचायत समितीच्या आवारात येऊन घोषणा दिल्या. गटविकास अधिकारी यांच्यावर आरोप करीत, पैसे हवेत उडवले व तेथून निघून गेले. घडलेल्या या प्रकाराने नागरिक अवाक झाले, उडवले पैसे काही काळ आवारातच पडून होते. नंतर तेथे उपस्थित नागरिकांनी पैसे जमा केले.
नेमका प्रकार काय आहे?
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, माझ्या गावात विहिरीचे 20 प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. तेव्हा मी आणलेले 1 लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर माझ्याकडे कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून 12 टक्के प्रमाणे रक्कमेची मागणी करण्यात आली. यामुळे 2 लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो, पण या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले नाहीत, अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिली.