मुंबई : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी आता पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले होतं आणि त्यानंतर आता शिर्डीच्या साईबाबा यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे. यामुळे एक नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वक्तव्यामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली असून, धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
धीरेंद्र शास्त्री जबलपूरमध्ये भागवतकथा कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बागेश्वर सरकार दरबारात लोकांशी बोलत होते. तेव्हा साईबाबांविषयी विचारलेल्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींनी साई बाबांना देव मानण्यास नकार दिला. आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलं नाही. शंकराचार्यांचं म्हणणं मान्य करणं बंधनकारक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट ही सनातनींचा धर्म आहे कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. कोणीही संत असेल मग ते आमच्या धर्माचे असले तरी ते देव असू शकत नाहीत असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे.
साई संस्थानने केला निषेध
साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या आहेत. त्यामुळे साईसंस्थाकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली, मात्र आम्ही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्रीना दिला आहे.
राधाकृष्ण विखे यांची कारवाईची मागणी
समाजात अशी लोक बाबा बुवाचे रूप घेऊन स्वतःला देव म्हणवून घेतात, लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. शासनाला विनंती आहे की, अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. आशा विधानातून ते धार्मिक तेढ निर्माण करू पाहत आहेत. सामाजिक अशांतता निर्माण करत आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या साईबाबांवर अशा प्रकारे वक्तव्य करणे चूक असून अशाप्रकारे चिखलफेक करणे चुकीचे असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.