जळगाव : भाजपकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ दोन जिल्हाध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्राथमिक आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपने आतापासूनच निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अलर्ट वर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी भाजपने संघटनात्मक बदलाची तयारी केली आहे. तसेच कसबामधील पराभवानंतर वरिष्ठ पातळीवरून संघटनात्मक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ही विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पक्षातील अंतर्गत घडामोडींबाबत चर्चा केल्याचे समजते.
संघटनात्मक पदांबाबत मोठे नेते इच्छुक नाहीत
भाजपकडून काही मोठ्या पदाधिकारी व नेत्यांना संघटनेतील जिल्हाध्यक्ष पदासह इतर महत्त्वाच्या पदांबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक पद घेण्याबाबत नकार दिला आहे. भाजपमधील काही बडे पदाधिकारी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक आहेत तर काही नेते विद्यमान आमदार आहेत. विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. अशा परिस्थितीत संघटनेचे पद घेतल्यास मतदारसंघात वेळ देता येणार नाही. त्यामुळे बड्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक घेण्याबाबत इच्छुक नसल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.
महानगर प्रमुख पदासाठी पदाधिकाऱ्यांचा जोर
जळगाव शहराच्या महानगर प्रमुख पदासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी जोर लावला आहे. इच्छुक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या नेत्यांकडे आपले नाव सुचविले जात आहे. काही बडे पदाधिकारी देखील आपली नियुक्ती होण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहे. महानगर प्रमुख पद घेण्यासाठी काही जेष्ठ नेते देखील इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शक्य याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.