जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील पुंडलिक सपकाळे यांचे सरपंच पद रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केल्याच्या राग आल्याने सहा जणांनी आनंदा दगडू सपकाळे व चेतन विजय साळूंखे (वय- 25, दोन्ही रा. कानळदा) या मामा-भाच्याला मारहाण केल्याची घटना कानळदा येथे घडली. या मारहाणीत एकाने भाच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे चेतन साळुंखे हा मामा आनंदा सपकाळे यांच्याकडे वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील सोसायटीजवळ सपकाळे यांचा काही लोकांशी वाद झाल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार त्यांनी भाचा चेतन याला फोनवर सांगून सोसायटीजवळ बोलवून घेतले. चेतन हा भांडण सोडवित असताना अचानक एकाने त्याच्या डाव्या हातावर चाकूने वार केला. तर इतर दोन जणांनी मानेवर विट मारून फेकली. यात तो जखमी झाला. त्यानंतर त्यास उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याला कानळद्यातील पुंडलिक सपकाळे यांचे सरपंच पद रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्याचा राग येवून मारहाण करण्यात आल्याची माहिती मामा आनंदा सपकाळे यांनी दिली.
जबाब नोंदविल्यानंतर कारवाई
जखमी चेतन साळुंखे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर तालुका पोलिसांनी चेतन याचा जबाब नोंदविल्यानंतर मारहाण करणा-यांविरूध्द भादंवि कलम 324, 323, 504, 143, 147, 148 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.