भारतात बनवलेल्या औषधाची अमेरिकेत चौकशी सुरू झाली आहे. या औषधामध्ये औषध प्रतिरोधक बॅक्टेरिया असण्याची शक्यता अमेरिकेच्या सर्वोच्च वैद्यकीय वॉचडॉगने व्यक्त केली आहे. हे औषध भारतात बनवलेले आयड्रॉप आहे जे अमेरिकेत विक्री होत आहे. या आयड्रॉपच्या वापरामुळे लोकांमध्ये संसर्ग पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या हवाल्याने असे म्हटले आहे की, ज्यांनी हे आय ड्रॉप वापरले त्यांच्यापैकी तीन लोकांचा मृत्यू झाला तर 8 जणांची दृष्टी गेली आहे. याशिवाय डझनभर लोक संसर्गाचे बळी ठरले आहेत. या आयड्रॉपचे नाव अझरिकेअर आर्टिफिशियल टीअर्स असे सांगितले जात आहे, जे चेन्नईस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने बनवले आहे.
कंपनीने परत मागविले लॉट
या औषधाबाबत फेब्रुवारीमध्ये अशा बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, तर 55 हून अधिक लोकांना याचा त्रास झाला होता. त्यानंतरच ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने फेब्रुवारीमध्ये अमेरिकन बाजाराशी संबंधित आयड्रॉप्सचे उत्पादन बंद केले होते. ग्राहक स्तरावर, अॅझरीकेअर आर्टिफिशियल टीअर्स आणि डेल्सम फार्माचे आर्टिफिशियल टीअर्सचे उर्वरित लॉट देखील परत मागविण्यात आले आहेत.
डोळ्यात होतोय संसर्ग
त्याच वेळी, या प्रकरणात समोर आलेल्या बातम्यांनुसार, स्यूडोमोनास ऑरुगिनोसा नावाच्या बॅक्टेरियामुळे लोक आजारी पडत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांनी आधी सांगितले होते की त्यांना आयड्रॉपच्या बाटलीत हा जीवाणू सापडला होता. सीडीसीने 21 मार्च रोजी या संदर्भात आपली वेबसाइट शेवटची अपडेट केली होती, ज्यामध्ये कंपनीने असे म्हटले होते की हे आयड्रॉप वापरल्यानंतर कोणाला कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरकडे जावे. यापूर्वी भारतात बनवलेल्या कफ सिरपवरून गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये गदारोळ झाला होता. या कफ सिरपमुळे डझनभर लोकांचा मृत्यू झाला होता. आता आय ड्रॉपमुळे गंभीर परिणाम समोर आले आहेत.