जळगाव : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुसावळचे माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर अत्तरदे यांना ले-आऊट एनए करण्यासाठी संतोष चौधरी यांनी एक कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ही कारवाई एलसीबीतर्फे करण्यात आली होती.
जिल्हा न्यायालयात याचिका
या प्रकरणी संतोष चौधरी यांना कारागृहात जावे लागले होते. यानंतर याच प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्यांना २ वर्षे १ महिना आणि १८ दिवस इतकी शिक्षा सुनावली होती. यामुळे विद्यमान नियमानुसार ते निवडणूक लढविण्यासाठी अपात्र होते. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या या शिक्षेच्या विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन आज निकाल लागला. यात संतोष चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यास विधीज्ज्ञ सागर चित्रे यांनी संतोष चौधरी यांची बाजू प्रभावीपणे मांडली.