लखनऊ : राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर नेहमी खोके घेतल्याचा आरोप केला जातो. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्र्यांकडून त्यांनी किती पैसे घेतले, जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रीपदावरुन कसे काढले हे सर्व मला माहितीय, अशा शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे.
शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंकडे एक टीम आहे जी त्यांना खोटं कसं बोलायचे ते शिकवते. मुंबईचा पैसा कुणी लुटला हे जनतेला माहिती आहे. किती मंत्र्यांकडून किती पैसे मागितले, जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रिपदावरून कसे काढले हेसुद्धा मला माहिती आहे. खोकेबहाद्दारांनी असे बोलणे चुकीचे आहे. शेवटी नैतिकता असते. जेव्हा नैतिकता सोडली जाते तेव्हा लोकांच्या संयमांचा बांधही तुटतो. तो आणि तुटायला देऊ नये. ठाकरेंच्या अनेक गोष्टी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत असेही मंत्री केसरकर म्हणाले.
संजय राऊत राष्ट्रवादीशी प्रामाणिक
सत्ता त्यांच्या डोक्यात गेली होती. सत्तेचा माज असल्याने ज्येष्ठ मंत्री, आमदारांनाही ते वेळ देत नव्हते. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठे आहेत हे कुणालाही माहिती नसायचे. बंगल्यात बसायचं आणि राज्य करायचं या कॅटेगिरीतील आदित्य ठाकरे आहेत. तसेच सत्ता गेल्यानंतर जो थयथयाट सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. लोकांची मने दुखावण्यात पाप असते. ते संजय राऊत रोज करतात. ते ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक नाहीत तर शरद पवारांची प्रामाणिक आहेत. राष्ट्रवादीसाठी काम करतात. शिवसेना फोडायचे जे काम राऊतांना राष्ट्रवादीने दिले ते त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे समाधान झाले असेल तर त्यांनी शांत राहणे आवश्यक आहे असा टोला केसरकरांनी राऊतांना लगावला.