रावेर: शेतकऱ्यांकडून बळजबरीने टोल वसूल करणे, अरेरावी इत्यादी प्रश्नासाठी आमदार चंद्रकांत पाटील आणि प्रहार जनशक्तीचे नेते अनिल चौधरी यांनी आज रावेर ते बऱ्हाणपूरच्या दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर धडक देऊन नागरिकांची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज दिली. दरम्यान यापूर्वी आ. शिरीष चौधरींना पण हा विषय सांगितला पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
या संदर्भातील वृत्त असे की, रावेर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थांकडून रावेर-बऱ्हाणपूर टोलनाका संबंधित विविध तक्रारी प्राप्त होत होत्या. शेतकऱ्यांकडून बळजबरी टोल वसुली करणे, अरेरावी करणे, ट्रॅफिक समस्या निर्माण करणे तसेच इतर गोष्टींबाबत येथील कर्मचारी अरेरावी करत होते. शेतकरी आणि नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्यानंतर आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेर-बऱ्हाणपूर टोल नाक्यावर धडक दिली.
टोल व्यवस्थापनाला दिला इशारा
यावेळी व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला तसेच कडक इशारा देत पुन्हा असे गैरप्रकार टोल नाक्यावर होणार नाही यांची हमी व्यवस्थापनाकडून घेण्यात आली. रावेर तालुक्यातील शेतकरी व स्थानिक नागरिक खूप जास्त त्रस्त होते होता. यांची दखल घेत आमदार पाटील आणि अनिल चौधरी यांनी टोल प्रशासनाला कायद्याची जाणीव करूण दिली. त्यांनी टोल मॅनेजर पांडे यांना कडक शब्दांमध्ये समज दिली. जिल्हाधिकारी व रावेर तहसीलदार सोबत चर्चा होत नाही तोपर्यंत टोल चालू करायचं नाही अशी समज दिली. यावेळी वाय. डी. पाटील, संदीप पाटील, उमेश वरणकर, भैय्या पाटील, संजय कोळी, मुजफ्फर भाई, मझहर खान, कुणाल बागरे, शांतीलाल पाटील, मुकेश पाटील यांच्यासह शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.