अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याबरोबर असलेले सर्व मंत्री आणि आमदारांनी देखील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. राम प्रभुचं दर्शनं घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले. ते म्हणाले, राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही ही चूक दुरुस्त केली, असा टोला लगावला.
अयोध्येत आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेब ठाकरे व लाखो रामभक्तांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. भाजप आणि शिवसेनेचे विचार एकच आहे. मात्र, काही जण जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही जणांना हिंदुत्वाची ॲलर्जी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही जण धनुष्यबाणावरुन आमच्यावर टीका करत आहेत. शिवधनुष्यबाण हे प्रभू श्री रामाचे आहे. त्यामुळे धनुष्यबाणावर टीका करुन ते प्रभू श्री रामाच्या धनुष्यबाणाचा अपमान करत आहेत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. सत्ताच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक दुरुस्त केली आहे. काही जणांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. त्यामुळेच ते आमच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे.
राम मंदिर राजकारणाचा नव्हे, अस्मितेचा विषय
श्री राम प्रभुच्या आशिर्वादाने आम्हाला पार्टीचे नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही. अयोध्येतील वातावरण राममय झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वेगळेच कंपन जाणले. राम मंदिर आमच्यासाठी श्रद्धा, अस्मितेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराचे काम इतक्या वेगानं होत आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आज अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. माझ्या आयुष्यातील हा सर्वात भाग्यशाली दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझे जंगी स्वागत झाले. यापूर्वी मी कार्यकर्ता म्हणून यात्रेच नियोजन करायचो. मात्र, आता माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे नियोजन केले.