जळगाव : तालुक्यातील विदगाव येथे दोघा गुन्हेगारांनी एकाकडे दोन लाखांची खंडणी मागितली शिवाय खंडणी न दिल्यास भावाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी, सचिन रतन सोनवणे (दोन्ही रा.विदगाव ता.जि.जळगाव) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान कोळी (वय ४३) हे विदगाव येथे परीवारासह वास्तव्यास असून ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भगवान कोळी हे घरी असतांना संशयित अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे यांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत भगवान कोळी यांना म्हटले की, तुझा भाऊ बिल्डरशीपचा व्यवसाय करतो. तू देखील आता कपाशी व गहु विकलेला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहेत. तुझा भाऊ जनार्दन कोळी हा अंगात सोने घालून फिरतो. आम्ही त्याला एखाद्यावेळी बंदुकीच्या गोळ्या घालून जिवे ठार मारुन त्याचे अंगावरील सोने लुटू, अशी धमकी दिली.
दोन लाख रुपये दे नाहीतर…
तुला जर तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसांच्या आत आम्हाला दोन लाख रुपये दे नाहीतर त्याचा विदगाव येथे भरचौकात गोळ्या घालून खुन करू अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली व आम्ही आताच एका दरोड्याच्या गुन्ह्यातून जेलमधून सुटून आल्याने आमचे कोणीही काहीही करू शकत नाही, अशी धमकी देऊन शिविगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी व सचिन रतन सोनवणे या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वासुदेव मराठे करीत आहेत.