पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून धमकी दिल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या फोन कॉलनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. तपासाची सूत्र वेगाने हलवण्यात आली. या प्रकरणात धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. राजेश मारूती आगवणे असं या आरोपीचं नाव आहे.
धमकी प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने याबाबत पोलिसांना कबुली जबाब दिला आहे. दारूच्या नशेत हा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी राजेश मारुती आगवणे याने कौटुंबिक वादानंतर मद्यप्राशन करून सदर कॉल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पुण्यातील वारजे येथून फोन केला
आरोपीची बायको पुण्यात धायरी येथे वास्तव्यास आहे. तर पुण्यातील वारजे येथून आरोपीने धमकी देणारा फोन केला. 112 नंबरला सोमवारी रात्री ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे..’ असे बोलून त्याने फोन कट केला. तो धारावी येथील रहिवासी असून मुंबईतच वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरुडला काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दुसऱ्यांदा केला धमकीचा कॉल
काल रात्री प्रथम त्याने 112 वर call करून छातीत दुखतंय ॲम्बुलन्स पाठवा असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून 108 ला कळवा असे सांगण्यात आले. त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबरवरून त्याने मुख्यमंत्री यांना धमकी देण्याचा कॉल केला. त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्ती कोण आहे, याचा तत्काळ तपास केला. त्याच्यासंबंधीची प्राथमिक माहिती मिळाली असून दारुच्या नशेत त्याने हा कॉल केल्याचं उघडकीस आले आहे.