मुंबई : राज्याच्या राजकारणात बाबरी मशीद प्रकरणाचा मुद्दा तापू लागला आहे. बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनाला घेरलं असून, उद्धव ठाकरेंनी हल्ला चढविला आहे. उध्दव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका मांडली.
भाजपचे तळवे किती दिवस चाटणार?
लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा सर्व उंदीर लपलेले होते. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले असे म्हणत, बाबरी शिवसैनिकांनीच पाडल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत. भाजपचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता स्वत:चे थोबाड कोणत्या जोड्याने फोडून घेणार आहात? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील म्हणाले, बाबरीचा ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते? शिवसेना तिथे गेली होती? की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.