पुणे : दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. देशात यंदा सामान्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे.
यंदा भारतात मान्सून सामान्य असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केला. यंदा देशात मान्सून साधारण म्हणजे 96 टक्के असणार आहे. आयएमडीने 1951 ते 2022 या मान्सून मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. जर देशात 90 ते 95 टक्के पाऊस झाला तर तो सामान्यपेक्षा कमी समजला जातो. 96 ते 104 टक्के हा सामान्य पाऊस आहे. जर 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर जास्त पाऊस असतो. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळ समजला जातो.
पुढील अंदाज केव्हा
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयएमडीचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल नीनोच्या परिणामासंदर्भात बोलता येणार आहे. अल नीनो असणार आहे, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. परंतु आजवर 15 वेळा अल नीनो सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. अल नीनो चा मान्सूनशी 40 टक्के संबध गृहीत धरला जातो.