राजमुद्रा : राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारानंतर महायुती सरकारच्या खातेवाटपटाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच महायुती सरकारच खातेवाटप जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या खाते वाटपासंदर्भात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे.. त्यानुसार पुढच्या काही तासातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या पक्षांना कोण कोणतं खाते मिळणार हे स्पष्ट होणार आहे..
महायुती सरकारमध्ये गेल्या खाते वाटपावरून असणारा गोंधळ आता दूर झाला असून खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत. तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खात्यावर अडून बसले होते.. गृहखात्याच्या बदल्यात त्यांना दुसरा पर्याय ही दिला होता.. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने अधिक मुसंडी मारल्यानंतर भाजपच मोठा पक्ष ठरला..या महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.
महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.