सातारा राजमुद्रा वृत्तसेवा । अजित पवारांनी जास्तीत जास्त दौरे सातारा जिल्ह्यात करावेत आणि माझ्या विचारांना जास्तीत जास्त चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने त्यांनी करावेत. आम्ही वेळोवळी सूचना देऊ त्या त्यांन आचरणात आणाव्यात, असा खोचक सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना साताऱ्यातील दौऱ्यावरून दिला आहे.
जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांना सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे अलिकडच्या काळात वाढले आहेत. याविषयी विचारले असता खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, त्यांचे दौरे होतात ही चांगली गोष्ट आहे. वास्तविक हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण ते माझ्या मताशी सहमत आहेत.
त्यांना सांगितले की, जास्तीत जास्त दौरे सातारा जिल्ह्यात त्यांनी करावेत. माझ्या विचारांना जास्तीत जास्त चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देत जाऊ. त्या सूचना आचरणात आणण्याचे काम तुमच्यासारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केले पाहिजे. ते करतीलही, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.