जळगाव : भुसावळहून जळगाव येथे मेमूने येणाऱ्या तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव विजय बारी (वय 20, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.
प्रणव बारी हा तरुण पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता व शुक्रवार, 10 फेब्रुवारी रोजी आई ज्योती बारी यांच्यासोबत भुसावळ येथे मावशीला भेटण्यास आला व रविवारी सकाळी सात वाजता मेमूने आईसोबत जळगावकडे निघाला होता. यावेळी रेल्वेतून तोल गेल्याने स्वामी समर्थ मंदीराजवळ पडल्याने जखमी झाला. नातेवाईकांच्या मदतीने गोदावरीत त्यास हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान प्राणज्योत मालविली. या घटनेबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.