मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी पहाटेच्या शपथविधीवरून आता भाजपकडून वेगवेगळे खुलासे केले जात आहे. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहाटेच्या शपथविधी’वर सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावरून राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हा गौप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. इतकंच नाही तर महामंडळाच्या वाटपाबाबतही पवारांशी चर्चा केली होती आणि खातेवाटपाबाबतही पवारांशी बोलणं झालेलं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीकडून सरकार स्थापनेचा प्रस्ताव
2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा सुरु होती. ती चर्चा पुढे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याचदरम्यान आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माझा दोंन्हीकडून विश्वासघात
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. उद्धव ठाकरेंची काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु असताना आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाल्याचे फडणवीस म्हणाले.