जळगाव : सिहोर येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष उत्सवादरम्यान शुक्रवारी एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. जळगाव येथील परिवार आपल्या लहान मुलासह कुबेरेश्वर धामला पोहोचले होते. दरम्यान, आणखी एका महिलेचाही जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत दोन महिलांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 73 जण आजारी पडले आहेत.
गुरुवारी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी परिस्थिती अनियंत्रित झाली होती. शुक्रवारीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम थांबवण्यात आला होता. यानंतर देशभरातून रुद्राक्ष घेण्यासाठी आलेले लोक रिकाम्या हाताने परतायला लागले. पंडित मिश्रा म्हणाले की, आता वर्षभर रुद्राक्ष मिळणार आहे.
पायी चालताना तब्येत बिघडली
रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. याचदरम्यान, त्यांचा 3 वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची तब्येत बिघडली, चालताना तो अधिकच आजारी पडला, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. असं वृत्त एका राष्ट्रीय हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. या बालकाचा अंत्यविधी मध्यप्रदेशातील सिहोर या ठिकाणीच करण्यात आलेला आहे. घटनास्थळी त्याच्या परिवारातील आई-वडील, काका, काकू, आजोबा उपस्थित असून आज रात्रीपर्यंत ते जळगावात दाखल होणार आहे.
आता रुद्राक्ष वर्षभर मिळणार
दरम्यान, शुक्रवारी कथेच्या दुसऱ्या दिवशी पंडित मिश्र म्हणाले – पूर्वीच्या रुद्राक्ष उत्सवापासून हेच कळले आहे की रुद्राक्ष उत्सवाचे आयोजन करावे, रुद्राक्षाचे शिवलिंग करावे, विधी देखील केले पाहिजे. फक्त तो रुद्राक्ष रुद्राक्ष उत्सवाच्या वेळी वाटू नका आणि वर्षभर कुबेरेश्वर धामला येणाऱ्यांना द्या. जे भक्त येऊ शकत नाहीत, ते वर्षभरात कधीही येऊन येथून रुद्राक्ष घेऊ शकतात.