मुंबई : शिंदे-ठाकरे गटाच्या लढाईत शिंदे गटाला धनुष्यबाणासह शिवसेना हे नाव मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली असताना उद्धव ठाकरे यांनी आज उघड्या जीपमधनून भाषण करीत मोदी सरकारवर टिका केली. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. चोरबाजाराचे मालक धनुष्यबाण पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही शिवाय पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी सडकून टिका ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
तो डंख मारण्याची वेळ आता आली
गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही. आज महाशिवरात्रीचा दिवसाचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं, धनुष्यबाण चोरलं गेलं आहे, पण चोरणार्यांना माहिती नाही की, त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशीने जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला आहे पण अजून तो डंख लागलेला नाही, तो डंख आता मारण्याची वेळ आली आहे, असा इशारा आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री बाहेर ओपन कारमध्ये उभं राहून कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
ते गुलात उद्या राज्यपाल होतील
मी कुठं खचलेलो नाही, खचणार नाही, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. काँग्रेस देखील फुटली होती त्यावेळी त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं होतं. समाजवादी पक्षाच्या वेळी पुढच्या पक्षानं दावा सोडला त्यावेळी चिन्ह दिलं गेलं. जयललितांच्या वादावेळी वाद मिटल्यानं चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, एक न्यायमूर्ती देखील राज्यपाल झाल्याचा दाखला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
हा तर आपला मोठा विजय
आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं, हीच बाळासाहेबांची ताकद आहे. मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं हा आपला मोठा विजय आहे. पण महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही, त्यांना मुखवटा कोणता आणि असली चेहरा कोणता हे माहिती आहे. पुन्हा एक आव्हान देतोय, ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला पवित्र्य धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानानं करतायत त्यापद्धतीने ते आली मशाल ही निशाणीही काढतील, अस म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.
या चोरांना आता निवडणुकीत धडा शिकवणार !
माझ्या हातात काही नाही पण एवढंच सांगतो. तरुण रक्त त्यांनी चेतवलेलं आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलेलो आहे. खांद्याला खांद्याला लावून शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेऊन चोरांना धडा शिकवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या किती पिढ्या आल्यातरी तुम्ही शिवसेनेला संपवू शकणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.