चाळीसगाव: माणसाने कोणाच्या घरात जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते. परंतू आपल्या कर्तुत्वाच्या बळावर उंच शिखर गाठत आकाश भरारी घेण हे नक्की त्याच्या हातात असते. अनेकदा उंच भरारीसाठी कोणाची तरी भक्कम साथ हवी असते. आणि हिच साथ या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून तुम्हा सर्वांना देत आहे. मिळालेल्या या प्रोत्साहनातून भरारी घेत परिस्थितीवर मात करा. चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांना म्हटले जाते त्यांच्या कार्याला कृतीतून आदरांजली देण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालूक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती व शिक्षण व सहकार महर्षी स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या पूण्यतिथी निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालूक्यातील आर्थिकदुष्टया दुर्बल कूटूंबातील प्रतिभावान विदयार्थ्यांसाठी स्व. रामराव जिभाऊ पाटील विदयार्थी सन्मान शिष्यवृत्ती वितरण समारंभाप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
चाळीसगाव शहरातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला व्यासपिठावर तालूक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस अधिक्षक एम. राजकूमार, मुख्यकार्यकारी अधिकारी. जि.प, जळगाव डॉ. पंकज आशीया, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंह देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव उपस्थित होते.
४२५ विद्यार्थ्याना मिळाली शिष्यवृत्ती
आमदार चव्हाण पूढे म्हणाने की, ४२५ विदयार्थ्याना हि शिष्यवृत्ती देण्यात आली. यातील ४५ विदयार्थी हे पालकत्व नसलेले आहेत. सरासरी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे तसेच शैक्षणिक कर्ज, वस्तीगृह मिळवून देण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे. निवड समितीने पारदर्शकपणे आर्थिकदुष्टया दुर्बळ व प्रतिभावंत विदर्यार्थ्यांची निवड केली आहे. हि शिष्यवृत्ती अल्पशी असली तरी शिक्षणासाठी गरज भासल्यास निवड समिती नक्कीच अधिक मदतीची शिफारस करेल असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
शिक्षण आणि मेहनतीला पर्याय नाही
पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कूठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. आम्ही सर्व अधिकारी हे तुमच्या सारख्याच सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहोत. आपण ग्रामीण भागातील आहोत असा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास ठेवून मेहनत करा. प्रत्येकाने परिस्थितीचा बाऊ न करता चांगल्या दर्जाच शिक्षण घ्यायला हवे. शासनाच्या योजना कमी अधिक प्रमाणात कामात येतातच मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या सारखा लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी असल्याने तुम्ही फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. यशस्वी होण्यासाठी शिक्षण आणि मेहनतीला पर्याय नाही असे ते म्हणाले.
बहूआयामी लोकांची देशाला गरज
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशीया यांनी क्षेत्र कूठलेही असो, आपल्यातील वेगळेपण त्याठिकाणी दाखवावे, शिक्षणाबरोबरच विविध गुण अंगिकारले पाहिजे. येणाऱ्या काळात बहूआयामी लोकांची देशाला गरज आहे असे त्यांनी विदर्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता गवळी, एकनाथ गोफणे यांनी केले तर आभार प्रा.रविंद्र पाटील यांनी मानले.