पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले 65 लाख 13 हजार 800 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते. याप्रकरणावर पुणे येथील न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी जप्त केलेले दागिने सुपे कुटुंबीयांना परत करण्याचे आदेश दिले.
सायबर पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम नामदेव सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी अटक केली आहे. यात शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षार्थीं कडून पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोपही तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुपे यांना अटक केल्यानंतर तपासा दरम्यान सुपे यांच्या घरामधून 2 कोटी 34 लाख रुपये रोख व 65 लाख 13 हजार 800 रूपयांचे सोन्याचे दागिने, पतसंस्था मधील मुदत ठेवीच्या पावत्या, पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या मिळकतींचे कागदपत्रे जप्त केले होते.
काय झाला युक्तिवाद?
19 डिसेंबर 2021 रोजी तुकाराम सुपे यांच्या घरझडतीत एकूण 65 लाख 13 हजार 800 रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. जप्त केलेले दागिने परत मिळण्यासाठी सुपे कुटुंबियांनी अर्ज केला होता. सुपे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, हे दागिने सुपे यांच्या कुटुंबियांचे आहेत. याचा आरोपी सुपे यांच्याशी संबंध नाही. सोन्याचे दागिने हे जर पोलीस ठाण्यात पडून राहिले तर सुपे यांच्या कुटुंबीयांचे नुकसान होईल. खटल्याचा निकाल लागेपर्यंत जप्त सोन्याचे दागिने आहे त्या परिस्थितीत ठेवू व तसे बंधपत्र न्यायालयात देऊ. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून दागिने परत देण्याचा अर्ज मंजूर केला.