जळगाव : महामार्गावर ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवरच भरधाव वेगाने दुचाकी आदळल्याने नशिराबाद येथील 65 वर्षीय वृध्द शेतकर्याचा मोटारसायकलीवर बसलेल्या अवस्थेतच जागीच मृत्यू झाला. सकाळी सात वाजता हा अपघात घडला. विजय मुरलीधर पाटील (वय 65, पीपल्स बँकेसमोर, नशिराबाद) असे मयताचे नाव आहे.
जळगाव खुर्द गावाजवळ रेल्वेवरील उड्डाण पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना पुढे अपघाती जागा असल्याची कल्पना यावी म्हणून पुलावर सिमेंटचे मोठे ब्लॉक ठेवण्यात आले असून त्या ब्लॉकवरच विजय पाटील यांची दुचाकी (एम.एच.19 बी.बी.6933) धडकली. या अपघातात दुचाकीवर बसलेल्या अवस्थेतच डोक्याला मार लागल्याने शेतकर्याचा मृत्यू ओढवला.
पिंपळगाव येथे जाताना अपघात
रावेर तालुक्यातील पिंपळगाव येथे खाजगी कामासाठी निघाल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसीत) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विजय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व सचिन पाटील हा मुलगा आहे.