जळगाव : निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याच्या प्रकरणात तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात अॅड. प्रवीण चव्हाण यांना आज दि. २६ फेब्रुवारी रोजी चाळीसगावातून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. भोईटे यांनी दिलेला फिर्यादीनुसार, त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे येथे वर्ग केला होता. या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी जळगावच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोईटे यांच्या जळगावातील भोईटे नगरातील घरी ९ जानेवारी २०२२ रोजी छापा टाकला होता. यावेळी भोईटे घरी नव्हते. या कारवाईत पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच.२०.बीएन.०९०) रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या इतर साथीदारांसोबत आले. त्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला.
गुन्ह्यात संशयिताची नावे वाढवली
घरात प्रवेश केल्यानंतर सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत काही फाइल्स व रक्ताने माखलेला चाकू घरात ठेवला होता. यामागे मला गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. या सर्व बाबींचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंग असल्याचे भोईटे यांनी तक्रारीत म्हटले होते. तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनिल दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे करीत आहेत.
खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर
तर चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्या संदर्भात अॅड. प्रवीण चव्हाण हे चाळीसगाव येथे आज (रविवार) आले होते. यावेळी जळगाव शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चाळीसगाव येथून अॅड. चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. दरम्यान, चाळीसगावच्या खंडणीच्या गुन्ह्यात अॅड. चव्हाण यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे.