जळगाव : धावत्या बसमधे तिकीट काढण्याची विनंती करणा-या महिला कंडक्टरचा प्रवाशाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला संबंधीत प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव – जामनेर मार्गावर जाणाऱ्या बसमधे महिला कंडक्टर तिकीट बुकींगचे काम करत होती. त्यावेळी बसमधे हजर असलेल्या जामनेर तालुक्याच्या माळपिंप्री येथील अभय विठ्ठल गाढेकर या प्रवाशाला महिला वाहकाने भाऊ तु तिकीट काढून घे असे म्हटले. त्यावेळी अभय गाढेकर याने महिला वाहकाकडे वाईट नजरेने बघुन अश्लील हातवारे केल्याचा आरोप महिला कंडक्टरने केलेल्या तक्रारीत केला आहे. महिला वाहकाने केलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील करत आहेत.