पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांची महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत होती. तब्बल तीस वर्षानंतर काँग्रेसने कसब्यात पुन्हा मुसंडी मारली आहे. यापूर्वी 1991 पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.
1992 ला कसब्यात पोटनिवडणूक झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर 25 वर्षं गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळकांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापूर्वी 1978 ला अरविंद लेले निवडून आले, तेव्हापासून 1985 ची निवडणूक आणि 1991 ची पोटनिवडणूक हा अपवाद वगळता मतदारसंघ भाजपकडेच होता. कसब्यातून गिरीश बापट पाच वेळा आमदार झाले होते. या निवडणुकीत भाजपने प्रथमच ब्राह्मणेतर उमेदवार दिला होता.
भाजपने ताकद पणाला लावूनही पराभव
चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. कसब्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो झाला होता. तरीदेखील काँग्रेसनं याठिकाणी बाजी मारली.
कोण आहेत धंगेकर?
रवींद्र धंगेकर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला होता. धंगेकर तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विश्वासू राहिले आहेत. रविंद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले.