पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. तर चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी उशिरापर्यंत सुरू होती. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि मविआचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यात भाजपच्या आश्विनी जगताप या मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार रिंगणात होते. अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली आहेत.
मविआला बंडखोरीचा फटका
चिंचवड विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे चिंचवडमधील मतांचे विभाजन झाल्याचे फेऱ्यांमधून दिसून आले. कलाटे यांच्या बंडखोरीचा काटे यांना जबरदस्त फटका बसल्याचे या पोटनिवडणुकीत स्पष्ट झाले आहे.