मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरील जाहिरातीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. एसटी बसेसच्या फुटलेल्या काचांचे फोटो दाखवत ही कसली दळभद्री बस आणि त्यावरील जाहिरात, अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली. या टिकेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेतील भाषणात पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाइव्ह, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स आदी विषयांवरून चौफेर फटकेबाजी केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणाही साधला. अजित पवार यांना धारेवर धरत तुम्ही आता शिवसेनेचं प्रवक्तेपद घेऊन टाका, अशी मिश्किल टोलेबाजीही केली.
दादांनी ती संधी गमावली…
अजित पवार तर शिवसेनेचे प्रवक्ते झाल्यासारखेच बोलतात, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ते म्हणाले, दादांना फक्त पदच द्यायचं बाकी आहे. यावर फडणवीस म्हणाले, सहशिवसेना प्रमुख. एकनाथ शिंदे यांनी लगेच पुढची टिप्पणी केली. आता सह शिवसेनाप्रमुखही होता येत नाही. कारण शिवसेना आपली आहे. तीही संधी गेली.
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार म्हणाले होते, शिंदे-फडणवीस सरकारने कोट्यावधींच्या जाहिराती मागील सहा महिन्यात दिल्या. 17 कोटीहून अधिक रक्कम महानगरपालिकेच्या जाहिरातीवर खर्च केली. एसटी बसेसवरील जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. ‘वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ अशी घोषणा जाहिरातीत आहे. मात्र, ज्या बसवर ही जाहिरात लावली ती बस प्रचंड दळभद्री आहे. त्या बसच्या काचा फुटल्या आहेत. अरे कशाला असले धंदे करता, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.