पुणे : राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. सुरुवातीला इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तर छापून आलं होतं. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटला होता. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 15 हजार रुपये उकळून, त्यांना पास करून देण्याचं रॅकेटच चालवलं जात होते. या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. यानंतर साखरखेडा पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून तब्बल पाच जणांना अटक केली. यात दोन शिक्षकांचा समावेश आहे.
पेपर फोडणे पूर्वनियोजित कट
गंभीर बाब म्हणजे या पाचपैकी दोन जण हे संस्थाचालक शिक्षक असल्याचा समोर आलं. त्यांनी एक व्हाट्सअॅपचा ग्रुप करून या ग्रुपमध्ये गणिताचा पेपर लीक केला. तब्बल 99 सभासद संख्या असलेल्या या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये हा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली. गणिताचा पेपर फोडायचा आहे, हे सर्व पूर्वनियोजित होतं, त्यामुळे पोलिसांनी या पाचही जणांवर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा, त्याचबरोबर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
विधिमंडळात विरोधक आक्रमक
राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याना पेपर फुटीच्या मुद्दावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरलं होतं. यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळातील गोंधळानंतर सरकारने पेपर फुटीप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणानंतर बुलढाण्यातील 4 परीक्षा केंद्रांचे संचालक तडकाफडकी बदण्यात आले आहेत.