दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो, पण काशीमध्ये खेळल्या जाणाऱ्या होळीचा रंग देश आणि जगाच्या इतर भागांच्या तुलनेत वेगळा असतो. कारण बाबा विश्वनाथांच्या नगरीत महादेवाचे भक्त आहेत. फुले, रंग अन् गुलाल नव्हे तर स्मशानभूमीत चिता भस्माने होळी खेळली जाते. यावर्षी ही अनोखी होळी रंगभरी एकादशीच्या दिवशी वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर खेळली गेली.
मथुरा आणि वृंदावनमधील होळी जगभर प्रसिद्ध आहे. पण भगवान शिवाची नगरी काशीच्या होळीला एक वेगळीच परंपरा आहे. अशी होळी रंगभरी एकादशीच्या दिवशी काशीमध्ये खेळली जाते, हे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक स्मशानभूमीत पोहोचतात. काशीमध्ये स्मशानातील चितेच्या राखेने होळी खेळली जाते.
तीनशे वर्षांची परंपरा
काशीतील स्मशानभूमी असलेल्या हरिश्चंद्र घाटात अंत्यसंस्काराच्या चितेची राख घेऊन होळी खेळण्याची जुनी परंपरा आहे. रंगभरी एकादशी ज्याला अमलकी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चितेच्या राखेने होळी खेळण्याची परंपरा 300 वर्षांहून अधिक जुनी आहे. असे मानले जाते की बाबा विश्वनाथ दरवर्षी होळीच्या दिवशी मणिकर्णिका घाटावर येतात आणि भूत आणि आत्म्यांसह होळी खेळतात.
शिव-पार्वतीची अनोख्या रुपात पूजन
जगातील सर्वात अनोखी होळी येथेच खेळली जाते. काशीतील मणिकर्णिका घाटावर चिता जळत असताना दुसरीकडे भस्म होळी जळत साजरी केली जाते. या कार्यक्रमात शिव-पार्वतीचे एका वेगळ्या रुपात पूजन केले जाते. प्रथम बाबा महामसान नाथ आणि माता मसान काली यांची मध्यान्ह आरती केली जाते. यानंतर बाबा आणि मातेला चिता आणि गुलाल अर्पण केला जातो. यानंतर चिता भस्म होळी सुरू होते.