पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यावरून राजकीय नेत्यांकडून टोलेबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून पलटवार करण्यात आला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून देशात परिवर्तन घडून येणार मूड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकांना आता बदल हवा आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. रवींद्र धंगेकर यांनी मागील 30 वर्षे जे काम केले त्याला लोकांनी मते दिली, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
म्हणूनच रवींद्र धंगेकर निवडून आले
कसब्याच्या निकालावरून जर देशात बदल होणार आहे असे समजायचे तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. मग बारामतीची तुमची सीट जाईल असे म्हणायचे का? पिंपरी-चिंचवडचा काही भाग बारामती मतदारसंघाचा भाग आहे. मग तुमची बारामतीची सीट जाईल असे आम्ही म्हणू का? पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला असताना तुम्ही का पराभूत झालात, याचे आत्मपरीक्षण करा. कासब्यातील नाराजीचा फायदा तुम्हाला मिळाला. रवींद्र धंगेकर सातत्याने जनतेत होते म्हणू निवडून आले. आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कासब्याच्या निकालाचा वर्षभर काय आनंद साजरा करायचा तो करा. वर्षानंतर मोदींची लाट कशी असते हे पुन्हा तुम्हाला दिसेल, या शब्दांत दीपक केसरकर यांनी पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितले होते
उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितले होते. मात्र शरद पवार आणि राहुल गांधींवर तुमचा विश्वास होता. तुम्हाला वाटले कुणी पदावरून काढू शकत नाही. भाजपने तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींना तुम्ही खोटे बोलून फसवले, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला. तसेच मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी जे केले ते मोदी विसरले नाहीत. तुम्ही मात्र एका मिनिटांत सगळे विसरले. सत्तेसाठी शिवसेना फोडणाऱ्यांसोबत गेलात, अशी टीका केसरकर यांनी केली.
एकनाथ शिंदेंची खेडला सभा होणार
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली. या सभेला प्रयत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचीही खेडमध्ये सभा होणार आहे. केसरकर यांनी त्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या १९ मार्च रोजी खेडला सभा होईल. तेव्हा या सभेला गर्दी होईलच, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.