मुंबई: राज्यात एकीकडे होळीचा उत्साह असतानाच दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी सोमवारी सायंकाळी सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. तर, काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने रस्त्यांवर बर्फ साचला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरसदृश्य दृश्य दिसत होते. मात्र, या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावातील परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून काही ठिकाणी गारपीट झाली. तर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली आहे. गारपिटीनंतर काश्मीरसारखी सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. एक तास चाललेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
गव्हाचे सर्वाधिक नुकसान
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटीनंही झोडपून काढलं आहे. नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील 191 गावं अवकाळीने बाधित झाली असून सुमारे 2 हजार 685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका गव्हाला बसला असून 1 हजार 803 हेक्टरवरील गहू पिकाचं नुकसान झालं आहे. तर 775 हेक्टर द्राक्षाचे आणि 65 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झाले आहे.
8 मार्चपर्यंत परिस्थिती कायम राहणार
दरम्यान 8 मार्चपर्यंत हवामानाची हीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री उत्तर मध्य महाराष्ट्रावरून ढग पुढे जाताना दिसले ज्यामुळं ठाणे, कल्याण आणि इतर भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
मराठवाड्यात गारपीटीचा इशारा
पश्चिमी झंझावातामुळं अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळं अवकाळी पाऊस होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. परिणामी 9 मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा देण्यात हवामान खात्यानं दिला आहे. तर मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही आजच्या दिवसात पावसाची शक्यता आहे.