अहमदनगर : राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षा काळात विद्यार्थी आणि पालक अभ्यासासोबतच खाण्यापिण्याचीही मोठी काळजी घेतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील तालुक्यातील लोणी खुर्द येथील सध्या बारावी बोर्डाचे पेपर देत असलेली मुलगी तेजस्विनी मनोज दिघे हिचा फूड पॉइझनमुळे मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली. परंतु उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तेजस्विनी हिचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
यासंबंधी माहिती अशी की, लोणी येथील तेजस्विनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू होती. प्रवरानगर येथील केंद्रावर तिचा नंबर आला होता. विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते. गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. त्या दिवशी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले. काही वेळातच दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोट दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. मात्र, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलला हलविण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. सुदैवाने तिचे आजोबा यातून बचावले आहेत.