मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुक्तांना मारहाण केली होती. या प्रकरणी कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीवर आज निकाल जाहीर झाला. न्यायालयाने कोर्टाने आमदार कडू यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी 2017 साली दिव्यांगांच्या मागणीसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन केलं होतं. यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा नावाच्या आयुक्तांवर बच्चू कडू यांनी हात उगारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार कडू यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात आता नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे, दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली आहे.
जामीन मंजूर
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना ठोठावण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.