मुंबई: नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात भाजपाप्रणित आघाडीने सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनंही भाजपला पाठिंबा दिला आहे. यावरुन आता महाराष्ट्रात राजकारण तापू लागले आहे. या मुद्याला धरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. हा मुद्दा उपस्थित करताच विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकल्याने सभागृहात खडाजंगी पहायला मिळाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमधील परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला. “या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य आम्ही टीव्हीवर बघतोय. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे नेमके कसे वाहायला लागले आहेत? नागालँडमध्येही 50 खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय, अशा शब्दात टीका केली.
सत्ता तुमची, चौकशी करा ना- अजित पवार
गुलाबराव पाटील यांनी या विषयावर केलेलं भाष्य राष्ट्रवादीच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणले पाहिजे असे नाही. अध्यक्ष महोदय आज केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत काढली. केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कारण नसताना बदनामी करू नका. इशान्येच्या राज्यांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तिथे सगळे मिळून सर्वपक्षीय सरकार स्थापन करतात, अशी तिथली परंपरा आहे. भारतातला तो भाग, भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतलेला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज निर्माण करायचा काहीच कारण नाही.
हेच बदलाचे वारे का? – मुख्यमंत्री
अजित पवारांचा संताप पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही दररोज येऊन खोके-खोके करता. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. तुम्ही आतापर्यंत बदलाचे वारे वाहणार म्हणत होता. गुलाबराव पाटील यांनी हेच बदलाचे वारे का, असे विचारले. तुम्ही सरकारला नाही, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला म्हणता. हे कुठले तत्वज्ञान, असा सवाल केला. सोयीचे तेवढे घ्यायचे. आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे बघायचे वाकून, हे कसे चालते. नागालँडमध्ये न मागता पाठिंबा दिला. 2014 ला ही तुम्ही तसे केले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नसतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.