नवी दिल्ली: भारतीय हवाई दलात ‘अग्नीवीर’ बनण्याची चांगली संधी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अग्निवीर भरती परीक्षा 20 मे 2023 रोजी होणार आहे. ही भरती तरुण-तरुणी दोघांसाठी आहे. अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
अग्निवीर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार Agniveervayu anipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 17 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात.
अग्निवीर भरतीसाठी पात्रता
विज्ञान शाखेसाठी: मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांपैकी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे. किंवा 50% गुणांसह तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा. किंवा भौतिकशास्त्र, गणित या दोन गैर-व्यावसायिक विषयांसह 2 वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात 50% गुण. विज्ञान प्रवाहाव्यतिरिक्त: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण. इंग्रजी विषयात 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
पात्र उमेदवारांचा जन्म 26 डिसेंबर 2006 ते 26 जून 2006 दरम्यान झालेला असावा. म्हणजेच वयोमर्यादा 21 वर्षांपेक्षा जास्त नसावी. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.
भरती कशी होणार?
पात्र अर्जदारांना प्रथम 20 मे 2023 रोजी होणाऱ्या ऑनलाइन लेखी परीक्षेत बसावे लागेल. यानंतर शारीरिक चाचणी (PFT) आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदलात अग्निवीरांची भरती 4 वर्षांसाठी असेल. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर केवळ 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल. प्रशिक्षणादरम्यान, अग्निवीर भारतीय वायुसेना आणि भारतीय वायुसेनेच्या CSD कॅन्टीनचाही लाभ घेऊ शकतो. 48 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा असेल. वर्षाला 30 दिवस सुटी मिळेल. याशिवाय आजारी रजेचा पर्यायही असेल.