नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) 10 टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार बीएसएफच्या भरती नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत तसेच या भरतीसाठी माजी अग्निवीरांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. ही माहिती केंद्रीय गृहखात्याने एका पत्रकात म्हटले आहे.
अग्निवीर सेवेत असताना पहिल्या किंवा त्यानंतरच्या कोणत्या तुकडीत कार्यरत होते याची माहिती घेण्यात येईल. त्यानुसार माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये भरती करताना त्यांच्या कमाल वयोमर्यादेची अट शिथील केली जाईल. यासंदर्भात केंद्रीय गृहखात्याने 6 मार्चला अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफमधील एकूण रिक्त जागांपैकी 10 टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील जवानांना बीएसएफमध्ये भरती होताना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळणार आहे.
गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
गृह मंत्रालयानं (MHA) जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, सीमा सुरक्षा दल कायदा 1968 (1968 मधील 47) च्या कलम 141 मधील उप-कलम (2) खंड (B) आणि (C) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून याची घोषणा करण्यात आली आहे.
नियमांमध्ये सुधारणा
केंद्र सरकारनं अधिकारांचा वापर करून 2023 च्या भरतीसाठी सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर भरती नियम 2015 मध्ये सुधारणा जाहीर केली आहे. हा नियम 9 मार्चपासून लागू झाला आहे.
हवालदार पदासाठी वयात सवलत
केंद्र सरकारनं जाहीर केलंय की, कॉन्स्टेबल पदाशी संबंधित भागाचे नियम बदलले जातील आणि उच्च वयोमर्यादेत शिथिलतेच्या नोट्स समाविष्ट केल्या जातील. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना पाच वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व तुकड्यांच्या बाबतीत तीन वर्षांपर्यंत सूट दिली जाईल.