जळगाव : जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून, यातून नवीन स्थानके वा दूरक्षेत्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा पोलिस ठाण्यांवर कामाचा लोड येत असल्याने त्यांचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात येत होती. या अनुषंगाने आता जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यांचे होणार विभाजन
– अमळनेर पोलिस ठाण्याचे विभाजन करून शहर आणि ग्रामीण, असे दोन पोलिस ठाणे होणार आहेत. जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विभाजन होणार असून, म्हसावद येथे नवीन पोलिस ठाणे, जळगाव शहरचे विभाजन होऊन छत्रपती शिवाजी महाराजनगरसाठी नवीन ठाणे कार्यरत होणार आहे.
– पाचोऱ्याचे विभाजन होऊन नगरदेवळा येथे नवीन ठाणे होणार आहे, तर पारोळ्याचे विभाजन होऊन तामसवाडी येथे पोलिस ठाणे होणार आहे. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन कुऱ्हा-काकोडा, तर पहूरचे विभाजन होऊन शेंदुर्णी येथे नवीन ठाणे होणार आहे.
– यासोबत भडगावचे विभाजन होऊन कजगाव येथे पोलिस दूरक्षेत्र होणार आहे. निंभोऱ्याचे विभाजन होऊन ऐनपूर येथे, तर मेहुणबाऱ्याचे विभाजन होऊन पिलखोड येथे पोलिस दूरक्षेत्र होणार आहे.