पुणे : भंगार विक्रेत्यानं सरकारला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. बनावट बिलाच्या माध्यमातून विक्रेत्यानं ही फसवणूक केली आहे. या भंगार विक्रेत्यानं बनावट बिलं तयार करून सरकारची 70 कोटी 22 लाखांची फसवणूक केली आहे. भंगार विक्रेत्याला पुणे जीएसटी विभागाने थेट उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या विभागाने अशा प्रकारे परराज्यात जाऊन केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिराजुद्दीन कमालुद्दीन चौधरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. चौधरी याची ‘ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रीयल’ कंपनी आहे. त्याने बनावट बिले सादर करून 12 कोटी 59 लाखांचा जीएसटी कर बुडविला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुणे शहर सोडून फरार झाला होता. जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाने विशेष शोधमोहीम राबवली.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
भंगार व्यापारी उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेला असल्याची शक्यता लक्षात घेऊन एक पथक सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जबजुआ गावी रवाना झाले. तेथे चौधरी याच्या घरावर 3 दिवस पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. पुण्यात आणून त्याला न्यायालयासमोर हजर केले. ॲड. महेश झंवर यांनी काम पाहिले. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई अपर राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे, राज्य कर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर उपायुक्त मनीषा गोपाळे-भोईरे यांच्या देखरेखीखाली राज्य कर सहायक आयुक्त सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग, सतीश लंके, सतीश पाटील आणि राज्य कर निरीक्षकांच्या पथकाने केली.