जळगाव: जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत आज अत्यंत नाटकीय घडामोडीनंतर संजय पवार हे विजयी झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाल्यामुळे खडसे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. महाविकास आघाडी एकसंघ नसल्याने दूध संघानंतर जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही गमवावे लागले आहे. जिल्हा बँकेत बहुमत असूनही खडसेंचा उमेदवार पराभव होऊन राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार हे निवडून आले. संजय पवार हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. यावरुन एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादीतच खच्चीकरण सुरू झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.
जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसेंचं वर्चस्व होतं. मात्र, गेल्या काही वर्षात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वर्चस्वाला धक्के देण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महाजन-पाटील यांनी एकत्र येत खडसेंचं पानीपत केलं. त्यानंतर आताही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांना बळ देत खडेंना शह दिला.
संजय पवारांनी दिला धक्का
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने अध्यक्ष त्यांचाच होणार हे जवळपास निश्चित होते. उपाध्यक्षपदासाठी अमोल पाटील यांचे निश्चित झाले होते. तर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. निवड प्रक्रिया सुरु झाल्यावर राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवार यांना राष्ट्रवादीतील एक गट आणि शिंदे गटाच्या संचालकांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. एकूण २१ पैकी ११ मते मिळवून पवार यांनी बाजी मारली. उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे १०, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, काँग्रेसचे तीन, शिवसेना शिंदे गटाचे पाच, भाजपचा एक असे बलाबल आहे.
खडसेंच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले
अध्यक्षपदी निवडून आलेले राष्ट्रवादीचे बंडखोर पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. सहकार क्षेत्रात पक्ष नसतो, असे आमचे नेते अजित पवार नेहमी सांगतात. पवार हेच माझे नेते आहेतच; परंतु या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ज्येष्ठ संचालक चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे या सर्वांनी सहकार्य केल्याचा दावा केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही काँग्रेसची मदत झाल्याचा दावा करुन आघाडीतील असंतोष दाखवून दिला आहे.
राष्ट्रवादीनेच केला खरा गेम
महाविकास आघाडीकडे २१ पैकी १५ मते असताना खडसेंनी उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी सोडून शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला? बहुमत असताना त्यांनी काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा उमेदवार उपाध्यक्षपदासाठी देणे अपेक्षित होते. त्यामुळे शिंदेंबरोबर काँग्रेस नव्हे तर, राष्ट्रवादी गेली असल्याचा आरोप प्रदीप पवार यांनी केला. दूध संघानंतर जिल्हा बँक अध्यक्षपदही हातातून गेल्याने आणि काँग्रेसने केलेल्या आरोपांमुळे खडसे यांना आता यापुढे शिंदे गट, भाजपसह काँग्रेसच्या विरोधालाही तोंड द्यावे लागणार आहे.