मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. यासंदर्भात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे. अनिक्षा असं संबंधित महिला डिझायनरचं नाव असून वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मलबार हिल पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. डिझायनर महिला आणि तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला लाचेची ऑफर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हटलंय तक्रारीत?
अनिक्षा ही गेल्या १६ महिन्यांपासून अमृता यांच्या संपर्कात आली होती. त्यातूनच, ती अमृता फडणवीसांच्या घरीही आली होती. त्यावेळी, आपल्या वडिलांसंदर्भात सुरू असलेल्या एका खटल्यात शिथिलता आणण्यासाठी या महिलेने अमृता फडणवीसांना १ कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली होती. १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी अनिक्षाने अमृता यांना अज्ञान फोन नंबरवरुन व्हिडिओ क्लीप, व्हॉईस नोट्स आणि काही मसेजेच पाठवल्याचं अमृता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.