भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या मंगळवार दि 14 मार्च रोजी एकाच दिवसात तीन हजार 22 केसेसद्वारे कारवाई करीत तब्बल 17 लाख 30 हजारांचा दंड वसुल केला आहे. अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा भुसावळ विभागाचे कौतुक केले जात आहे.
मध्य रेल्वेने विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. रेल्वेचा तिकीट तपासणी पथकाने तीन हजार 22 केसेसद्वारे एकूण 17 लाख 30 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
एक दिवसीय तिकीट चेकींग मोहिम
डीआरएम एस.एस.केडीया, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव- धुळे तसेच जलंब-खामगाव विभागात एक दिवसीय तिकीट चेकींग मोहिम राबवण्यात आली.
70 गाड्यांची तपासणी
वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त पथक तयार करून सुमारे 70 गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांच्यासह तीन अधिकारी, तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य स्टाफ व आर.पी.एफ स्टाफ अशा एकूण 42 टीमने सहभाग नोंदवला. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्या योग्य ते तिकीट घेवून प्रवास करावा तसेच युटीएस अॅप प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे